आमची माहिती
भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७५ वर्षांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान प्रगती केली. इस्त्रोमार्फत अवकाश क्षेत्र असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मशीनरीज, कृषी अशा अनेक क्षेत्रांचा उल्लेख करता येईल. पण ही सगळी प्रगती काहीशी सच्छीद्र राहीली असल्याचं आपल्या सगळ्यांना बऱ्याचवेळा जाणवत राहतं. आपली शिक्षण पद्धती, खेळ, महिला सबळीकरण, आर्थिक व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, सरकारी प्रशासकीय पद्धती अशी अनेक क्षेत्रं सांगता येतील की, जिथे परिपूर्णता येण्यासाठी बरेच काम करणे गरजेचे आहे.
नागरिक म्हणून आपण कधी वैयक्तिकरित्या किंवा सामूहिकपणे या त्रुटींवर फक्त चर्चा करत राहतो आणि सरकारी पातळीवर या सर्व त्रुटींवर मार्ग कसा निघेल याची वाट बघत राहतो. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय यंत्रणेची असंवेदनशीलता यात मुख्यतः जबाबदार असतेच , पण नागरीकांची निष्क्रियताही तितकीच जबाबदार असते. हा विचार करुनच २५ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘सावली सोशल सर्कलची’ स्थापना करण्यात आली.आपल्या आजूबाजूला प्रकर्षाने जाणवणाऱ्या समस्यांवर कुणावरही अवलंबून न राहता, नागरिक म्हणून आपण काय उपाययोजना करु शकतो? याचा विचार करून कृतिशील कार्यक्रम आखणे ही मुख्य विचारधारा घेऊन सोशल सर्कल काम करते.
समाज जीवनाच्या विविध १६ भागांमध्ये सोशल सर्कल काम करते. स्थापनेपासून २ वर्षांमध्ये युवा, महिला, विद्यार्थी, रंगकर्मी, कुटुंबव्यवस्था या घटकांसाठी उपयुक्त असे अनेकविध उपक्रम याअंतर्गत राबवले आहेत.
आपण सावली सोशल सर्कलचे सदस्य बनून त्याच्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुमच्या मनातील एखादा प्रकल्प सर्कलच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणू शकता.