सावली सोसिअल सरकली विषय विभाग
01.
कुटुंब कट्टा
घर म्हणजे घरातील माणसं. या माणसांतील संवादच अलिकडे जरा हरवू लागला आहे. घरात दिवेलागणीच्या वेळी शुभंकरोती म्हणणे, रात्री आजी/आजोबा गोष्टी सांगत झोपवायचे, सुट्टीमध्ये सगळेजण मामाच्या गावाला एकत्र जमून धमाल करायचे, सुरपारंब्या, विटीदांडू, लगोरी असे खेळ असायचे ह्या सगळ्या दंतकथा वाटू लागल्या आहेत. यामूळे कुटुंबातील सदस्यांचे बंध पुर्वीसारखे घट्ट राहीलेले नाहीत अशी भावना दिवसेंदिवस दृढ होत चालली आहे.
हे बंध घट्ट करण्याचे काम हा विभाग करेल. मग यामध्ये लहान मुलांसाठी संस्कार वर्ग असतील, किशोरवयीन मुलांसाठी वाचनशिबिर, नितीशास्त्र, कौटुंबिक नातेसंबध यावरील कार्यशाळा तर प्रौढांसाठी समुपदेशन, बालसंगोपन, सुजाण पालकत्व शिबिरं असे उपक्रम घेतले जातील.
02.
समाजभान कट्टा
समाजामध्ये अनेक लहानमोठे प्रश्न असतात. संवेदनशील व्यक्तींना ते जाणवत असतात. काहीजणांनी तर त्यावर उपायसुद्धा शोधलेले असतात मात्र ते आमलांत कसे आणायचे याचे मार्ग त्यांना माहित नसतात. बर्याचवेळा सामाजिक प्रश्नांसाठी सरकारनेच उपाययोजना करावी अशी मानसिकता असते. मात्र समाजाचा एक भाग म्हणून आपणही पुढाकार घेऊन काही मार्ग काढता येतील का यावर विचारविमर्ष करुन काही ते कार्यन्वित करता येतील.
स्थानिक रोड ट्रॅफिक, वृद्धांचे प्रश्न, सार्वजनिक स्वच्छता, महिला आणि मुलांची सुरक्षा असे अनेक प्रश्न आपण आपल्या पातळीवर सरकारची कुठल्याही प्रकारची मदत न घेता सोडवू शकतो. यासाठी हा विभाग काम करेल.
या व्यतिरीक्त सामाजिक क्षेत्रात काम करणार्या स्वयंसेवी संस्थांचे प्रश्न सोडवणे, त्यांचे प्रदर्शन आयोजित करणे, समाज आणि सरकारी अधिकारी यांच्यात योग्य समन्वय होण्यासाठी प्रयत्न करणे आदी अनेक उपक्रम या विभागातर्फे राबवता येतील.
03.
युवा कट्टा
हल्लीची पिढी सातत्याने मोबाईल, कॉम्प्युटर, सोशल मिडियावर अडकलेली असते असा सार्वत्रीक आरोप होत असतो. बर्याच अंशी ते खरेही आहे. यातून त्यांना बाहेर काढायचे असेल तर तितकेच इंटरेस्टींग पर्याय त्यांना उपलब्ध करुन द्यावे लागतील.
निसर्गसहली, पक्षी निरिक्षण शिबिरं, जंगल सफारी, किल्ले/पर्वत यावर मुक्त भटकंती, ट्रेकिंग शिबिरं, अॅडव्हेंचर शिबिरं अशी युवा मनाला साद घालणारे उपक्रम आयोजित केले जातील.
युवा महोत्सव, हॅप्पी स्ट्रिट, मैत्र महोत्सव, कला-क्रिडा महोत्सव असे इव्हेंटस् केले जातील.
04.
शैक्षणिक कट्टा
शिक्षण हे शाळेत जाऊनच मिळते हा समज आधी खोडून काढला पाहिजे कारण खरं शिक्षण तर बर्याचवेळा शाळेच्या बाहेरच मिळत असतं. बेरजा-वजाबाक्या जरी शाळेत शिकवल्या जात असतील तरी पैशाचे व्यवहारज्ञान तर बाहेरच शिकावं लागत.
हेच जे बाहेरचं शिक्षण या विभागाअंतर्गत शिकवलं जाईल. यामध्ये नैतिक मुल्यशिक्षण, हस्ताक्षर वर्ग, सकारात्मक दृष्टीकोन, सभाधारिष्ठ्य, संभाषण कला, व्यक्तीमत्व विकास, स्वदेशी/विदेशी भाषा वर्ग, भाषांतर कला, व्यवस्थापन कौशल्य असे विषय शिकवले जातील.
जेष्ठ्य नागरींकांसाठी संगणक वर्ग, सोशल मिडिया, ई मेल, स्मार्ट मोबाईल ऑपरेशन्स, व्हिडिओ कॉल्स अशा अधुनिक तंत्रज्ञानाच्या कार्यशाळाही घेण्यात येतील.
05.
विज्ञान व तंत्रज्ञान कट्टा
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर तंत्रज्ञानाचा प्रचंड प्रभाव पडत असताना आपल्याला त्यापासून लांब राहून कसे चालेल? अगदी घरातल्या मिक़्सरपासून ते वॉशिंग मशिनपर्यत घरात तंत्रज्ञानाने शिरकाव केलेला आहे. ते काबीज केले तर घरातील स्त्रियांना ते वरदानच ठरणार आहे.
बर्याच पालकांची मुलं आता शिक्षणासाठी/नोकरीनिमित्ताने मोठ्या शहरांत/विदेशांत स्थलांतरीत झाली आहेत. मोबाईल/व्हीडिओ कॉलस्/ई मेल हे त्यांच्याशी संपर्काचे उत्तम साधन झाले आहे. खरेदीसाठी, विविध बिले भरण्यासाठी ऑनलाईन व्यवहार हा आता परवलीचा शब्द झाला आहे. ते शिकून घेतले असता घरबसल्या आपण सगळे व्यवहार करु शकतो. ज्येष्ठ नागरीकांसाठी हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी काही कार्यशाळा घेता येतील.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवता येतील. इस्रो, अणूविज्ञान केंद्र यांच्या मदतीने विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक यांच्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध करुन देता येईल.
विज्ञान तंत्रज्ञान विषयक जिज्ञासा असलेल्यांसाठी तज्ञांची व्याख्याने व कॉम्प्युटर, मोबाइल प्रशिक्षण वर्ग, सोशल नेटवर्कींग कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.
विज्ञान विषयक चित्रपट, माहितीपट दाखवणे, कार्यशाळा यांचे नियोजन
06.
पर्यावरण कट्टा
ग्लोबल वार्मिंग, डिफॅारेस्टेशन, वाढते प्रदुषण, पाणी टंचाइ सारख्या प्रश्नाविषयी सरकार आपल्यापरीने उपयायोजना करत आहेच पण नागरिक म्हणून आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करु शकतो?
पर्यावरण कट्टा या विषयावर विचारमंथन आणि कृती कार्यक्रम ठरवेल.
या विषय विभागाअंतर्गत आपण स्वच्छ शहर-सुंदर शहर, थुंकीमुक्त शहर, वृक्षलागवड व संवर्धन, प्रदुषण मुक्त परिसर, ओला कचरा व्यवस्थापनातुन सुशोभिकरण, टाकाऊ पासून टिकाऊ संबंधीत उपक्रमांचे आयोजन व कार्यशाळा राबवल्या जातील.
07.
आरोग्य कट्टा
शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्ही प्रकारचे आरोग्य ही माणसाची मुलभुत गरज आहे. बर्याचदा आपण शारीरिक आरोग्याच्या बाबतीत सजग असतो मात्र मानसिक आणि सामाजिक आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष्य करतो.
समाजातील सर्व घटकांसाठी मानसिक आरोग्यविषयक कार्यक्रम घेणे, कौन्सिलींग सेंटर्स चालवणे
पार्किंसन्स, ऑटिझम, स्क्रिझोफ्रेनिया, डिमेंन्शिया यासारख्या दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सेल्फ हेल्प ग्रुप तयार करणे.
शारीरिक व मानसिक अपंगत्वासंदर्भात जनजागृती कार्यक्रम करणे, अशा लोकांसाठी वैद्यकिय, वैयक्तिक आणि सामाजिक पुनर्वसन प्रकल्प राबवणे.
08.
आर्थिक कट्टा
सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आपल्या उद्योगाचे अर्थचक्र सक्षम आहे का? ते आहे त्यापेक्षा सुदृढ करता येऊ शकेल का? कर्ज उभारणी करताना काय दक्षता घ्याव्यात? गुंतवणूक/बचत यांचे गणित कसे बसवावे? आपला व्यवसायातील नफा कसा वाढवता येईल? कॉस्ट कटिंग टेक्निक्स कशी वापरता येतील? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे तज्ञांकडून मिळवण्याचे खात्रीशीर व्यासपीठ म्हणून हा कट्टा काम करेल.
आर्थिक अडचणीत असलेल्या व्यवसायांना त्यांची घडी बसवण्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन करता येईल.
09.
कौशल्य विकास कट्टा
आजच्या जलदयुगात रोजगार मिळणे म्हणजे मैलाचा दगड होय. ’शिक्षण आहे पण नोकरी मिळत नाही….’ अशी ओरड सर्वत्र ऐकु येते. आपण जे शिक्षण घेतले आहे त्याची व्यावहारीक दर्जा किती आहे हे पण तपासून घेतले पाहिजे. तुम्हाला नोकरी मिळवुन देणारे कौशल्य अवगत करवुन दिले तर?
रोजगारभिमुख नसलेल्या कागदोपत्री शिक्षणाचा तोटा लक्षात घेता सावली क्लब आपल्यासाठी कौशल्य विकास उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतुन आपण गरजुंना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण उपलब्ध करवुन कुशल कर्मचारी ब्युरो स्थापन करणार आहोत. ज्यांत नोंदणीकृत कुशल कर्मचार्यांना रोजगाराची हमी देता येइल.
10.
उद्योग/व्यापार कट्टा
कितीही गुणवत्ता असली तरी मराठी मुलांचा/पालकांचा स्वाभाविक कल हा नोकरी करण्याकडे असतो. ती सरकारी असेल तर सोन्याहून पिवळे. पण मग सगळ्यांना मनाजोगती नोकरी कशी मिळणार?
नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे का बनू नये? हाच दृष्टीकोन रुजवण्यासाठी हा विभाग काम करेल. या विभागाअंतर्गत मुलांमध्ये उद्योजकता विकासासाठी प्रयत्न करता येईल.
यशस्वी उद्योजक आणि तज्ञांचे मार्गदर्शन उप्लब्ध करुन देता येईल.
11.
साहित्य कट्टा
’जावे पुस्तकांच्या गावा…..पण त्याऐवजी लेखकच आपल्या भेटीला आले तर?…..काव्यरचनेचा भावार्थ आपण आपल्या परीने समजुन घेतो, पण तोच कवी स्वत:च्या रचनेबद्दल बोलु लागला तर?…
काय गंमत होईल नाही!!!…..
सावली क्लब मध्ये आपण असेच हर्षानुभव घेणार आहोत. आपले आवडते लेखक, कवी कादंबरीकार, नाटककार आपल्याला प्रत्यक्ष भेटुन आपल्या साहित्यकृतींबद्दल बोलणार आहेत. तसेच आम्ही आपल्या आवडत्या साहित्यकृतींचे अभिवाचन, काव्यवाचन, कवी संम्मेलनातुन, मुशायरा, आदी साहित्यविश्वाची सफर घडवुन आणणार आहोत.
12.
संगीत / नाट्य कट्टा
’जावे पुस्तकांच्या गावा…..पण त्याऐवजी लेखकच आपल्या भेटीला आले तर?…..काव्यरचनेचा भावार्थ आपण आपल्या परीने समजुन घेतो, पण तोच कवी स्वत:च्या रचनेबद्दल बोलु लागला तर?…
काय गंमत होईल नाही!!!…..
सावली क्लब मध्ये आपण असेच हर्षानुभव घेणार आहोत. आपले आवडते लेखक, कवी कादंबरीकार, नाटककार आपल्याला प्रत्यक्ष भेटुन आपल्या साहित्यकृतींबद्दल बोलणार आहेत. तसेच आम्ही आपल्या आवडत्या साहित्यकृतींचे अभिवाचन, काव्यवाचन, कवी संम्मेलनातुन, मुशायरा, आदी साहित्यविश्वाची सफर घडवुन आणणार आहोत.
13.
कला कट्टा
पुर्वीच्या काळात गुरुकुल पद्धतीत ज्ञानार्जन केले जात असे. 14 विद्या , 64 कलांचा समावेश असत, या 64 कलांपैकी एक तरी कल आपणांस आत्मसात करता आली तर?…..
सावली क्लब मध्ये आपणांस आपल्या आवडीनुसार हस्तकला, शिल्पकला, म्युरल्स, फोटोग्राफी, चित्रकला, इंद्रजाल, मिमिक्री यासारख्या विविध कलांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभाग घेता येइल. तसेच त्यातुन निर्माण झालेल्या कलाकृती व सेवांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे.
दुर्मिळ अभिजात आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवणे, चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन
14.
क्रिडा कट्टा
इतक्या मोठया लोकसंख्येच्या देशात ऑलिम्पिकमध्ये साधी दोन अंकी पदकसंख्या मिळवण्याइतपतही क्षमता का निर्माण होत नाही. आपल्यापेक्षा कितीतरी कमी लोकसंख्या असणार्या देशांना कितीतरी जास्त पदके मिळतात. आपल्यात नक्की काय कमतरता आहेत त्या जाणून त्या दुर करण्याचे काम आपले नव्हे काय? मग तेच या कट्ट्यामार्फत आपण करुया.
खेळासंबंधी जागृती, खेळाडुंना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता जाणून योग्य त्या खेळाची निवड करण्यास मदत, खेळाडूंच्या क्षमतांच्या नियमित चाचण्या, परफॉरमन्स एनहान्समेंट प्रोग्रॅम्स, स्पोर्टस् इंज्युरीज झालेल्या खेळाडूंसाठी रिटर्न टू स्पोर्टस् प्रोग्रॅम्स, खेळासाठी आवश्यक असणारे इंफ्रास्ट्रक्चर/इक्विपमेंटस् यांची उपलब्धता, रेफरीज/कोचेस/रेकॉर्ड किपर यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीरे, डोपींगसंदर्भातील जनजागृती यासारखे अनेक उपक्रम आपल्याला राबवता येतील.
उद्देश एकच :- 2024 सालच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला जास्तीतजास्त पदके मिळवणे.
15.
पोटोबा कट्टा
दाक्षिणात्य खाद्यपदार्थांत इडली, डोसा, आप्पे व्यतिरिक्त कोणता लोकप्रिय पदार्थ आपणास माहित आहे. ओरिसाची खीरमोहन कधी चाखलीये का?…पुरणपोळ्याही पाच प्रकारे करता येते, आपणांस माहिती आहे का?…. आता विविध राज्यांच्या खाद्ययात्रेची सफर करण्यास सज्ज व्हा, कारण सावली क्लब मार्फत राबववण्यात येणार्या पोटोबा कट्टा या उपक्रमात पाककलेत निपुण असलेल्या ख्यातनाम शेफ मंडळींकडुन प्रशिक्षण वर्ग/कार्यशाळा राबवणार आहोत. तसेच आपणांस बनवलेल्या पदार्थांची प्रदर्शन व विक्री देखील करता येइल.
16.
विठोबा कट्टा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून ते 21 व्या वर्षी समाधिस्थ झाले. सामान्यत: हा ग्रंथ आपण निवृत्त झाल्यावर वाचायला घेतो. आयुष्य कसं जगावं हे सांगणारा ग्रंथ आयुष्य संपताना अभ्यासला जातो. वास्तविक ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान लहानपणापासून शिकवले जायला हवे.
विठोबा कट्ट्यामार्फत आपण हेच जीवन तत्वज्ञान समजेल अशा भाषेत लहानग्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जीवनातील खरे साध्य काय असावे, सुख-समाधान कशात आहे हे जर खर्या अर्थाने आपल्याला या मुलांपर्यंत पोहोचवता आले तर त्यांच्यात येणारे नैराश्य, आत्महत्येचे विचार दुर करण्यात आपल्याला बर्यापैकी यश येईल असा विश्वास वाटतो.
इच्छुकांसाठी किर्तन प्रशिक्षण वर्ग, सुभाषित पाठांतर वर्ग, श्लोक पठण यासारखे उपक्रमही करता येतील.
Subscribe Us
We will notify you before events come up